वर्धा - नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ७) शनिवारी सकाळी वणा नदीवरील पुलावर ट्रक आणि कंटेनरची धडक झाली. कंटेनर आणि मालवाहू ट्रकच्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, कंटेनर चालक जखमी झाला आहे. जखमीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुजीब खान, असे ट्रक चालकाचे नाव असून तो हैदराबादचा रहिवासी होता. तर जखमी झालेला अनिलकुमार यादव यूपीचा रहिवासी आहे. शनिवारी सकाळी वणा नदीच्या पुलावर हा अपघात झाला. एक तासाच्या मेहनतीनंतर ट्रकचे पत्रे तोडून मृताला बाहेर काढण्यात आले. यासाठी हिंगणघाट पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठे परिश्रम घेतले. तर कंटेनरचालक अनिल कुमारला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
दोन वर्षांपासून पूल दुरुस्तीचे काम सुरूच
राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणघाट नजीकच्या वणा नदीच्या पुलावर मागील दोन वर्षांपासून पूल दुरुस्तीचे काम सुरू आहे. जड वाहनांसाठी एक पूल मागील दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा पूल अपघातास कारणीभूत ठरताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात अपघातात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग मंडळाच्यावतीने याकडे लक्ष देत त्वरीत पूल दुरुस्ती करण्याची मागणी हिंगणघाटवासीयांनी या निमित्ताने केली आहे.