सोलापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कुर्डुवाडी येथील बोबडे रुग्णालयामध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. माढा तालुक्यातील कोरोनाबाधितांवर याठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
कुर्डुवाडी शहरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची आवश्यकता होती. डॉ. रोहित बोबडे यांनी पुढाकार घेत, आपल्या रुग्णालयामध्ये सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये 30 बेडची सोय असून यात 5 आयसीयू बेड आहेत. सध्या 5 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. यातील एक रूग्ण आयसीयूमध्ये तर चार रूग्ण सामान्य असल्याचे डॉ. बोबडे यांनी सांगितले. या सेंटरमुळे माढा तालुक्यातील आणि कुर्डुवाडी शहरातील कोरोना रूग्णांची सोय होणार असल्याचे प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.
दरम्यान, रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन सुरू करणार आहोत. रूग्णांच्या आरोग्यासाठी प्राणायम, योगासने आणि संगीताची सोय रुग्णालयात करण्यात येणार आहे. प्रशासन सर्वतोपरी मदत करीत असल्याचे डॉ. रोहित बोबडे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी, धनंजय डिकोळे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.