ठाणे- पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवताना वाचवणारा मित्रच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यात घडली आहे. कैलास तुकाराम भगत (वय 32 रा. नागाव) असे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
मौजमजेसाठी चिंबीपाडा येथील वारणा नदीच्या बंधाऱ्यावर ७-८ मित्र पोहायला गेले होते. याचवेळी नदीला पूर आल्याने त्या पुराच्या पाण्यात एक मित्र वाहून जात होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्रांनी पुराच्या पाण्यात उड्या घेऊन त्याचा जीव वाचवला. मात्र त्याला वाचवताना कैलास भगत हा युवक पुराच्या पाण्याच्या भोवऱ्यात अडकून नदीच्या प्रवाहात वाहून गेला.
कैलास हा माजी शिवसेना नगरसेवक रोहिदास भगत याचा भाऊ असून कैलास आज मित्रांसोबत चिंबीपाडा येथील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत दुपारचे जेवण झाल्यावर ७-८ मित्र पोहण्यासाठी बंधाऱ्याच्या पाण्यात उतरले. मात्र दिवसभर पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढून बंधाऱ्यावरून पाण्याचा जोराने विसर्ग सुरू होता.
यावेळी महेश भगत हा पुराच्या खोल पाण्यात वाहून जात होता. त्याला वाहून गेलेला कैलास व त्याच्या मित्रांनी सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र, कैलास पाण्याच्या वेगवान भोवऱ्यात सापडल्याने तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. भिवंडी तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत कैलासचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.