ठाणे : अरुंद गल्लीत इमारतीच्या शौचालयाच्या मलनि:सारण पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी अरुंद गल्लीतील खोदकामामुळे नजीकच्या घराखालील पाया धसल्याने त्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली खोदकाम करणारे तीन मजूर अडकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भिवंडी शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर भागात घडली आहे. विशाल, अनुष व विष्णुदेवा चव्हाण असे ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या तीन मजुरांची नावे असून या दुर्घटनेत स्थानिक युवक गणेश हादेखील जखमी झाला आहे.
सर्वत्र विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर येथील घरालगत अरुंद गल्लीत इमारतीच्या शौचालयाच्या मलनि:सारण पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक खोदकामामुळे नजीकच्या घराखालील पाया धसल्याने या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली खोदकाम करणारे विशाल, अनुष व विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर अडकून पडले होते. तर त्यावेळी त्या ठिकाणाहून जाणारा स्थानिक युवक गणेश हा जखमी झाला आहे. विष्णुदेवाने स्वतःची सोडवणूक करून घेतली. दरम्यान, घटनास्थळी दाखल अग्निशामक दल व आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या दोन मजूरांची तीन तासाच्या प्रयत्ननंतर सुटका करण्यात यश मिळविले.
कविता चंद्रमौळी एलगट्टी या विधवा महिलेचे हे घर आहे. ती आपल्या दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने सुदैवाने बचावली आहे. याठिकाणी मागील तीन दिवसांपासून खोदकाम सुरू असल्यामुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इमारतीमधील व्यक्तींकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदर दुर्घटना घडली आहे. यावेळी, घटनास्थळी महानगरपालिका मुख्यालय उपायुक्त डॉ. दीपक सावंत, सहाय्यक आयुक्त नूतन खाडे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी भेट देत मदातकार्याची माहिती घेतली. सध्या जखमींवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - ठाण्यात परिवहन सदस्य शमीम खान यांचे स्टिंग ऑपरेशन, कामचुकार कर्मचार्यांना दणका