ठाणे - मागील दोन दिवसात शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या असल्याने लाखो मतदार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत. उत्तर भारतीय, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या मतदारांची संख्या प्रचंड असल्याने विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. मतदानाचा हा घसणारा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे २४ तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये १ लाख ५ हजार ६१० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ठाण्यात ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार असून त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ७३.७३ टक्के आहे. जिल्ह्यात ७७ भरारी पथके नेमली आहे. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५० तर, नवी मुंबई हद्दीत ८ आणि ठाणे ग्रामीणमध्ये १९ अशी एकूण ७७ भरारी पथके आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्रात २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील! ९६७३ केंद्राचे होणार लाइव्ह वेबकास्ट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रकिया सुलभ सुरळीतपणे राबवण्यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघामध्ये या निर्देशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात एकूण ६६२१ मतदान केंद्रे असून, लिफ्ट सुविधांसह असलेले २५१ मतदान केंद्रे वगळता ६३७० मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. यापैकी ५५०८ ही मतदान केंद्रे तळमजल्यावर आणि ८६२ मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत.