ठाणे - जिल्ह्यात ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देत गावकऱ्यांची पायपीट होत आहे. त्यातच मत मागायला कल्याण लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे त्या गावात गेल्याने येथील गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. खासदार साहेब ५ वर्षे होते कुठे? असा संतप्त सवाल विचारल्याने खासदारांनी गावकऱ्यांसमोर लवकरच पाण्याचा प्रश्न सोडणार असल्याचे आश्वासन देवून काढता पाय घेतला. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील पालेगावात घडली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे प्रचारासाठी गावोगावी फिरून मत मागत आहे. त्यानुसार अंबरनाथ नगरपालिकेत पालेगाव या प्रभागात शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक शिवाजी गायकवाड व अन्य शिवसेना नेते व कार्यकर्ते पायी प्रचार करीत होते. दरम्यान, यावेळी या नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली.
पालेगाव येथील गावकऱ्यांनी या नेत्यांना पाणीप्रश्न व इतर नागरी समस्येवर चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी गावकऱ्यांनी अचानक डॉ. श्रीकांत शिंदे यांना घेराव टाकून प्रश्नांची सरबत्तीच केली. त्यानंतर तर त्यांना तुम्ही ५ वर्षानंतरच दिसता. एरव्ही तुम्ही कुठे असता? येथे भीषण पाणी टंचाई आहे. कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत, भरमसाठ घरपट्टी वाढवली आहे. पाण्याची टाकी बांधणार असल्याचे केवळ आश्वासन देतात. मात्र, अद्यापही टाकी बांधलेली नाही. असे आरोप ओंकार म्हसकर व इतर नागरिकांनी केले. मात्र, गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. शिंदे यांची चांगलीच दमछाक झाल्याचे व्हायरल व्हिडीओमधून दिसून आले आहे.
खासदार डॉ. शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे काय केले, असा सवाल विचारला. त्यावर किणीकर म्हणाले, की या भागात पाणी समस्या नाही. केवळ उंच भागावर पाण्याची समस्या आहे. तेथे काही तबेले आणि वीट भट्ट्यांना पाणी मिळत नाही. आम्ही पाण्याची टाकी बांधण्याचे प्रयत्न करीत आहोत. मात्र, जागेसाठी मंजुरी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेत मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून पालेगावमध्ये शिवसेनेचाच नगरसेवक, आमदार आणि खासदारही शिवसेनेचाच आहे. मग त्यांना या नागरी समस्या सोडवण्यात अपयश का आले ? असा सवाल या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पुढे आला आहे. त्यामुळे आमदार आणि खासदार यांची चांगलीच गोची झाल्याची चर्चा अंबरनाथ शहरात पाहावयास मिळत आहे.