ठाणे - एकीकडे कोरोनाचा प्रादुभाव पुन्हा वाढल्याने सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज होऊन आपआपल्या परीने कोरोना आळा घालण्यासाठी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यातच उल्हासनगर पोलीस परिमंडळच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र कायदा व नियम धाब्यावर बसवून ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारमध्ये छमछम सुरू असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस कर्मचारीच छमछम बारमधील नृत्यावर एका बारबालेसोबत बेधुंद होऊन आपला नृत्यकलाविष्कार सादर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वैजनाथ राख असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या डान्सबार विरोधात अनेक संघटना व समाजसेवकांनी तक्रारी करुनही या डान्सबारवर पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप होत असतानाच, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत पेट्रोलियम समोरील 'राखी बार'मध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छमछम उशिरापर्यंत सुरू असते. याच बारमध्ये वैजनाथ राख हा पोलीस कर्मचारी एका बारबालेबरोबर बेधुंद होऊन तिचा हात हातात घेऊन तिला गोल फिरवत नृत्य सादर करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे डान्सबार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, याचा छडा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लावण्याची मागणी पुढे आली आहे.