ठाणे - महिलेची हत्या करून तिचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळून गटारात फेकून देणाऱ्या दोन आरोपीना उत्तरप्रदेशहुन अटक करण्यात नारपोली पोलिसांना यश आले. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भिवंडीतील वळपाडा हद्दीत राहत होती. संगीता असे मृतक महिलेचे नाव आहे. तर सत्यम सुरेश सिंग (२४) असे अटक केलेल्या तिच्या प्रियकराचे नाव असून त्याचा मित्र अवधेश श्यामसिंग शैगर (३५) असे अटक केलेल्या दोघा आरोपीचे नावे आहेत.
गाऊनवरून पटली मृतदेहाची ओळख - एका ३० ते ३५ वर्षीय अनोळख्या महिलेचा मृतदेह ब्लॅकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत गटारात फेकून दिल्याची घटना २७ जुलै रोजी भिवंडी तालुक्यातील वळपाडा हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड मधील एका मोठ्या गटारात उघडकीस आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येसह पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नारपोली पोलिस ठाण्यात दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला होता. या घटनेचा नारपोली पोलीसांनी तपास सुरू केला असता पारसनाथ कंपाउंडमधील एका व्यक्तीने त्या महिलेची ओळख पटल्याने त्या महिलेचे नाव संगीता असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दुसरीकडे पोलिसांनी मृत महिलेच्या गाऊनवरून मृतदेहाची खात्री पटवून आरोपी सत्यम सिंग हा तरुण मृतक संगीता हिच्यासोबत पारसनाथ कंपाउंडमधील एका कंपनीत काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी कंपनीचे मालक धवल पटेल यांच्याकडे विचारणा केली असता आरोपी प्रियकर सत्यम सिंग व त्याचे अन्य चार साथीदार अवधेश,सुमित,मुकेश,विशाल हे १ जुलैपासून कामावर येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याअनुषंगाने त्यांच्यावर हत्येचा संशयाने बळावला होता.
मोबाईल लोकेशन आधारे दोघांना घेतले ताब्यात - या गुन्ह्याचा तपास करणारे सपोनि चेतन पाटील यांनी तांत्रिकरित्या तपास मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी सत्यम व त्याचे साथीदार उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोना जाधव, पाटील,पोशि बंडगर आदी पोलीस पथकासह उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाले. त्यावेळी सत्यमचे मोबाईल लोकेशन त्याच्या उत्तरप्रदेशमधील राहत्या घरी रसुलाबादमध्ये दाखवत होते. त्या आधारे नारपोली पोलिसांनी स्थानिक उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरचा पत्ता घेतला आणि शोध घेऊन सत्यम सुरेश सिंग आणि त्याचा मित्र अवधेश श्यामसिंग शैगर या दोघांना ताब्यात घेतले.
केबलने गळा आवळून हत्या - दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी सत्यम सिंग मृत महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे सांगून तो घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. तेव्हा त्याला मृत संगीताने डाटा केबल आणण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने संगीता हिला राग येऊन त्यांच्यात वाद झाला. हाच वाद विकोपाला जाऊन संगीताने त्याला मारहाण केली. त्याचा प्रतिरोध करण्यासाठी आरोपी सत्यमने मद्यधुंद अवस्थेत घरातच डाटा केबलने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून गटारात फेकल्याचे पोलिसांना समोर कबूल केले. त्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास सुरु केला.