ठाणे - ई-माध्यम हे प्रभावी असून त्याद्वारे नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. त्यासाठी ठाणे महापालिकेद्वारे ट्विटर हँडल तयार करण्यात आले आहे. याचा प्रचार-प्रसार करा, असेही आदित्य म्हणाले. त्यांच्या हस्ते आज @TMCATweetAway या ट्विटर अकाऊंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ठाणे शहरात एक नाट्यगृह असावे, या मागणीसाठी भर सभेत शिवसेना पक्षप्रमुखांना चिट्ठी देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेने ठाणेकरांचे स्वप्न पूर्ण देखील केले. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्वत चिठ्ठी देणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्या यासाठी ट्विटर हँडल सुरू करण्यात आले असल्याचे आदित्य म्हणाले.
मुंबई महापालिकेत देखील ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी एखाद्या ठिकाणची समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी नगरसेवकापासून ते महापालिकेर्पयत विविध विभागात नागरीकांना जावे लागत होते. मात्र. आता या ट्विटर पेजवर तुम्ही तुमच्या प्रभागातील तक्रारी, समस्या टाकू शकता. त्यामुळे नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्या समस्यांची दखल सुध्दा तत्काळ घेतली जाऊ शकते, असेही आदित्य यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, या माध्यमातून तक्रार करीत असताना नगरसेवकांनी अशा नागरीकांना पाठबळ देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याउलट आपल्या प्रभागातील नागरीकाने आपल्याकडे तक्रार न करता अशा पध्दतीने थेट तक्रार का केली? असा कांगावा करण्याची काहीच गरज नसल्याचेही आदित्य म्हणाले.
नगरसेवकांनी सुद्धा ट्विटर पेज हाताळणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने त्यांना त्यांच्या प्रभागातील समस्या समजतील. तसेच त्या दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येतील. शिवाय पालिकेने या पेजच्या माध्यमातून पालिकेतील इतर विभागांना जोडणे गरजेचे असल्याचे आदित्य म्हणाले. एवढेच नाहीतर फक्त मुंबई आणि ठाण्यामध्येच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबावायची असल्याचे आदित्य यांनी सांगितले.