ठाणे - वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी चार जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला असल्याची घटना ताजी असतांनाच, घोडबंदर भागातील युनिव्हर्सल या खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने रुग्णालयातील 12 रुग्णांना त्यांच्याच गोकुळनगर येथील युनिव्हर्सल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी रुग्ण हलवण्यात आले त्या ठिकाणी सकाळ पर्यंतचाच ऑक्सिजनसाठा शिल्लक असल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.
हेही वाचा - 'एमएमआर रीजनमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट करा'
ऑक्सिजनचा साठा संपत आल्यानंतर यासंदर्भात ठाणे महापालिकेला कळवण्यात आल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने केवळ दोन ऑक्सिजनचे सिलेंडर देण्यात आले. मात्र, हे ऑक्सिजन सिलेंडर अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ चालणारे नसल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांना गोकुळनगर येथील त्यांच्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
घोडबंदर भागातील वाघबीळ येथील युनिव्हर्सल रुग्णालय हे ४२ बेडचे रुग्णालय असून या रुग्णालयात ३५ रुग्ण सध्या उपचारार्थ दाखल आहेत. या ठिकाणी २८ ऑक्सिजनचे बेड आहेत. रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने चार तास आधीच त्यांनी या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधून त्यांना रुग्ण हलविण्याची मागणी केली. तसेच, संबधित रुग्णालयातील काही कर्मचारी देखील ऑक्सिजन सप्लायरकडे गेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. २५ सिलेंडर मिळतील अशी शक्यता त्यांना वाटत होती. परंतु, रात्री ८ वाजेपर्यंत त्यांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकले नाही. त्यानुसार आयसीयूमधील एका रुग्णाला सांयकाळी ६ च्या सुमारास दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उर्वरित रुग्णांना रात्री ८ वाजेपर्यंत हलविण्यात आले नव्हते. ठाणे महापालिकेने मात्र या रुग्णालयाला केवळ दोन ऑक्सिजनचे सिलेंडर दिले. मात्र, हे सिलेंडर केवळ अर्ध्या तासांपेक्षा जास्त चालणार नव्हते. परिणामी, 12 रुग्णांना युनिव्हर्सल रुग्णालयाच्याच गोकुळनगर येथील रुग्णायात हलवण्यात आले असल्याची माहिती डॉ. केदार यांनी दिली.
गोकुळ नगर येथील रुग्णालयातही ऑक्सिजनचा साठा पुरेसा नसल्याने या ठिकाणी देखील परिस्थिती गंभीर होण्याची परिस्थिती आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वत: तुर्भे येथील ऑक्सिजन प्लांट येथे दोन तासांपासून थांबले होते. तसेच, रात्री ७.५० च्या सुमारास संबधित खासगी रुग्णालयाच्या गाडीत ऑक्सिजन भरण्यास सुरवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही खासगी रुग्णालयामध्ये समन्वयाची भुमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, रुग्णालयात पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णांना गोकुळ नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - हफ्त्यांसाठी सतावणाऱ्या बँकांना समज द्या; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन