ठाणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मोबाईलवरून तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभान आजम खान (रा. समरूबाग, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पीडित महिला नजराना खान (वय, 21 रा. आजादनगर, भिवंडी) हिचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर पीडितेला पती व तिची नणंद हुस्नतारा ही शिवीगाळ करून नेहमी मारहाण करीत होते. तर आरोपी सुभान हा तिच्या चारित्र्यावर संशयही घेत असे, मात्र एवढा त्रास सहन केल्यानंतरही पीडित महिलेने चार वर्षे आपला संसार टिकवून ठेवला होता.
हेही वाचा - 'ईटीव्ही'ला २५ वर्षे पूर्ण; रामोजी फिल्म सिटीत थाटात पार पडला रौप्यमहोत्सवी सोहळा
तलाक देण्यापूर्वी सुभानने मोटरसायकल घेण्यासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये, असा पत्नीकडे तगादा लावला होता. पैसे न आणल्याने तिला नणंद आणि पतीने बेदम मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. २४ ऑगस्टला रात्री ११ च्या सुमाराला मोबाईलवर संपर्क करून तिला शिवीगाळ केली आणि मोबाईलवरूनच तिला तिहेरी तलाक दिला. 'तलाक' हा शब्द ऐकल्याने तिला धक्काच बसला. याबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 498 अ, 323, 504 प्रमाणे मुस्लीम महिला विवाह हक्क सरंक्षण कायद्यांतर्गत कलम 4 नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार आर.आर चौधरी करत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे. या संबधीचा कायदा होऊनही हुंड्यासाठी चक्क मोबाईलवरूनच तलाक, तलाक, तलाक बोलून पत्नीला तिहेरी तलाक दिल्याची घटना भिवंडीत दुसऱ्यांदा घडली आहे.