ठाणे - कल्याण शहरातील कल्याण-भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडीमूळे नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांमधून उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनाही बसत आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडी सुटावी म्हणून ३ वर्षांपूर्वी गोंविद वाडी बायपासचे काम करून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. मात्र दुसरीकडे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ६ पदरी दुर्गाडी पुलाचे काम रखडले, तर पत्रिपुलाचे काम ही संथगतीने सुरू असल्याने दुर्गा माता चौकात वाहतूक कोंडी नित्यनेमाने झाल्याचे दिसत आहे.
दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गा माता चौकात शहरातील चारही बाजूंनी येणाऱ्या शेकडो वाहनांच्या आवाजावीमुळे या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुर्गाडी पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांना या मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्याने त्यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागल्याची कबुली भूमिपूजन प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी दिली होती.
अशातही अद्याप या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. तर पत्रिपुलाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलिसांच्या चिरीमिरीमुळे बिनधास्तपणे अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप रुग्णवाहिका चालकांनी केला आहे. त्यामुळेच कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणे अवघड असल्याचे दिसून येत आहे.