ठाणे - व्यापाऱ्यांना पेन्शन योजना देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केल्याचे वक्तव्य केंद्रीय अवजड व संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी केले. कल्याण विधानसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या व्यापाऱ्यांच्या सभेत मेघवाल बोलत होते.
केंद्र सरकारने बांधकाम मजूर, घरगुती कामगारांसह विविध कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन योजना यापूर्वीच लागू केल्या आहेत. व्यापाऱ्यांनाही विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर तोडगा म्हणून मोदी सरकारने व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करण्याची तयारी केली आहे. तसेच व्यापारी आयोगही स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे माहिती केंद्रीय अवजड मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली.
हेही वाचा - कल्याण शहरासह ग्रामीण परिसराला परतीच्या पावसाने झोडपले; अनेक घरांचे नुकसान
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात युतीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी खास व्यापाऱ्यांसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांसह भिवंडीचे खासदार कपिल पाटील, कार्यक्रमाचे आयोजक नरेंद्र पुरोहित, शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईरसह यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.