ठाणे - भिवंडी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी व्यापाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातच व्यापाऱ्यांकडून 50 लाख रुपये लाच स्वीकारत असतानाच ठाणे लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात अटक केली आहे. मात्र या घटनेने महापालिकेच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना अटक केली आहे.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. यापूर्वी अनेक नगरसेवक, राजकीय नेते, माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह पत्रकारांवर लाचलुचपत विभागासह पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातच पद्मानगर भागातील शेकडो अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सिद्धेश्वर कामूर्ती यांनी जोर देऊन महापालिकेकडे तक्रार दिली. त्यांनतर येथील व्यापाऱ्यांचा संपर्क करून बांधलेल्या गाळ्यावर कारवाई करायची नसेल तर व्यापाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. जर हे पैसे दिले नाही तर एक फार्महाऊस व ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्थानिक आमदार महेश चौगुले यांच्याकडे धाव घेतली व संबंधित प्रकार सांगितला.
तसेच संबंधित व्यापाऱ्यांनी संबंधित प्रकार लाचलुचपत विभागाला माहिती दिली गेली पाहिजे आणि धडा शिकवला गेला पाहिजे म्हणून व्यापाऱ्यांचे प्रमुख राजकुमार चव्हाण यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास पद्मानगर भाजी मार्केट परिसरात स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना पहिला हफ्ता म्हणून 50 लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ते पैस लाच म्हणून स्वीकारत असतानाच ठाणे लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात अटक केली आहे .
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही तक्रारीचे निवेदन ..
भिवंडी शहरातील पद्मानगर या मुख्य बाजारपेठेत भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारलेल्या 67 व्यापारी गाळे उभारले असून यावर पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन केली होती. महसूल विभागाच्या नावे असलेली शहरातील मौजे कामतघर सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे जागा सदर सोसायटीस शेतकऱ्यांच्या विकासासाठी देण्यात आली होती. त्या जागेवर भात गिरणी, गोदाम सोसायटीचे कार्यालय होते. त्याचा फायदा पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांना होत होता. सोसायटीचे सभापती कमलाकर टावरे यांनी येथील भात गिरणी पंधरा वर्षांपासून बंद करून त्या जागेचा वाणिज्य वापर सुरू केला होता.
एक मजली वाणिज्य इमारत उभारून तब्बल 67 गाळे उभारले-
दरम्यान पालिकेने रास्ता रुंदीकरण करीत तेथे सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविला असता, रस्ता रुंदीकरणात येथील गाळेबाधित झाल्याचा फायदा घेत मालमत्ता क्रमांक 171,172,173 व 185 या जागेवर तळ अधिक एक मजली वाणिज्य इमारत उभारून तब्बल 67 गाळे उभे केले आहेत. 20 हजार रुपये प्रति चौ फुटाने विक्री करून 50 ते 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी केला होता. यासर्व अनधिकृत बांधकामांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली जाईल, असा इशारा सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दिला आहे.
हेही वाचा - नाशिक : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 4 हजार रुपये दर; आवक घटल्याचा परिणाम
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार