ठाणे - खोपट एसटी आगार येथील प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या गैरसोयींबाबत धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे एसटी महामंडळाला निवेदन देण्यात आले. ठाण्यातील अनेक नागरिकांनी विशेष करून महिला प्रवासी यांनी खोपट एसटी आगारात असलेल्या गैरसोयी तसेच आगारातील गैरप्रकाराच्या अनेक तक्ररी दिल्या होत्या. त्याचीच शहानिशा करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे आणि त्यांचे सहकाऱयांनी खोपट एसटी आगारात पाहणी केली.
पाहणी दरम्यान असे दिसून आले, की प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले शौचालय विशेषतः महिला प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. तसेच शौचालयाची दूरवस्था झालेली आहे. महिलांसाठी असणाऱ्या हिरकणी कक्षाचीदेखील दुरवस्था झालेली असून सॅनिटरी वेन्डीग मशीन तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आगारात असणारे पंखे, लाईट्स या यंत्रणा कित्येक दिवस बंदच आहेत. लोकांना बसण्यासाठी असणाऱ्या जागेवर अस्वछता आहे. तसेच येथे कर्मचाऱयांच्या सोईसाठी झोपण्यासाठी गाद्यांची सोय करणे अंत्यत गरजेचे आहे.
एसटी महामंडळातील कर्मचारी जेथे राहतात तेथे अस्वछता आहे. अशा अनेक समस्या या आगारात आहेत. यासाठी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांनी खोपट एसटी महामंडळाला यासंदर्भात निवेदन पत्र देण्यात आले आहे. तसेच ७२ तासांच्या आत सर्व अपुऱ्या असलेल्या सुविधा जर पूर्ण केल्या नाही तर धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल. त्यातून होणाऱ्या परिणामाला एसटी महामंडळ जबाबदार राहील, असा इशारा धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी दिला.