ठाणे - टिटवाळ्यातील बहुचर्चित भोंदूबाबा मंजू माताजीच्या कृत्याचा त्याच्याच भक्तांनी भांडाफोड केल्यानंतर बाबाने अटकेपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आठवड्याहून अधिक कालावधी लोटला तरी बाबा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याने कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज सादर केला होता. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश डी. एस. हातरोटे यांनी भोंदूबाबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे भोंदूबाबाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा येथील वैष्णवी माता मंदिरातील मुख्य पुजारी लालदीप सिंग ऊर्फ मंजू माता या भोंदू बाबाने श्रद्धाळू भक्ताच्या श्रद्धेचा गैर फायदा घेत होता. त्यांच्या भावनांशी खेळून त्यांना विश्वासात घेऊन त्यांची फसवणूक करीत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करीत होता. बाबाच्या सेवेकरी भक्तांनी बाबाच्या काळ्या कृत्याचा भांडाभोड केला होता. विकृत बाबावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करीत अंनिसच्या मदतीने टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
पोलिसांनी शनिवारी ११ मे रोजी भोंदूबाबाच्या मंदिरावर छापा टाकत कारवाईला सुरुवात केली. विकृत बाबाचे पितळ उघडे पडताच या नराधम बाबाने मंदिरातून पळ काढला. भोंदूबाबाने अटकेपासून बचाव करण्यासाठी गेल्या आठवड्यात सोमवारी (13 मे) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर करीत मुंबई कोर्टातून सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले होते. रेग्युलर कोर्टाला सुट्टी असल्याने अंतरिम जामीन अर्ज सुनावणीसाठी पुढील म्हणजेच सोमवार २० मे तारीख सुनावणीसाठी देण्यात आली होती.
सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्या न्यायालयासमोर बाबाच्या अंतरिम जामीन अर्जासाठी सुनावणी सुरू होती. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करीत बाबाची बाजू मांडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी या विकृत बाबाविरोधात भक्कम पुरावे सादर केले. तर फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. तृप्ती पाटील यांनी बाजू मांडताना आरोपी वकिलाचे सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपीला जामीन मिळाल्यास लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल आणि अशा विकृत आरोपींना पोलीस व न्यायव्यवस्थेचा धाक राहणार नसल्याचे पटवून दिले. न्यायालयाने बाबाचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणी शुक्रवारी 24 मे रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. तृप्ती पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे भोंदू बाबाला अटकेचा मार्ग मोकळा झाला असून पोलीस बाबाचा शोध घेत आहेत.