ठाणे - कोरोनाकाळात दोन ते अडीच महिन्यात हातातील नोकर्या गेलेल्या शेकडो मराठी तरुणांनी व्यवसायाकडे मोर्चा वळवला आहे. नवनवीन संकल्पना घेऊन पुढे आलेल्या या होतकरु स्थानिक मराठी तरुणांना महानगरपालिकेने आता पुन्हा फेरीवाला परवाना सर्वेक्षण करुन योजनेत सामील करुन घ्यावे. या सोबत परंपरागत पदपथ अडवून केल्या जाणार्या फेरीवाल्यांच्या व्यवसायाला छेद देत 'बिझनेस ऑन व्हील' ही अनोखी संकल्पना राबवून मोहिमेची सुरुवात करण्याची मागणी मनसेने केली आहे.
महानगरपालिकेने गेल्यावर्षी फेरीवाला सर्वेक्षण केले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कोरोना काळात बहुतांश परप्रांतीय फेरीवाले गावाकडे परतल्याने शहरात मराठी तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या काळातच तरुणांच्या नोकर्याही आहेत. त्यांनी भाजी, फळे, मत्स्य, जीवनावश्यक वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. याच तरुणांना फेरीवाला सर्वेक्षणात नव्याने सामील करुन त्यांना शहराच्या विविध भागात 'बिझनेस ऑन व्हील' या संकल्पनेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली.
मराठी तरुणांना अनधिकृत व्यवसाय करण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने 'पुनश्च हरिओम' या नात्याने फेरीवाला सर्वेक्षणात या तरुणांना संधी द्यावी. अधिकृतरित्या धंद्यात पाय रोवण्यासाठी बळ द्यावे, अन्यथा भविष्यात मराठी विरुध्द कोरोनाकाळात धंदा सोडून पळालेले परप्रांतिय असा संघर्ष उद्भवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सुविधा भुखंड खुले करा -
शहराच्या प्रत्येक मध्यवर्ती भागात सुविधा भूखंड उपलब्ध आहेत. याच ठिकाणी अथवा गृहसंकुलाच्या आवारात या तरुणांच्या ओपन ट्रक, फूड व्हॅनना परवानगी द्यावी. त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी वित्तीय साहाय्य, कौशल्य विकास योजनेच्या अनुषंगातून मार्गदर्शन करावे, अशीही मागणी निवेदनातून संदीप पाचंगे यांनी केली आहे. भविष्यात कोरोनानंतरच्या जगात अशाच व्यवसायांची गरज असून पालिका प्रशासनाचा हा पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरेल, हा विश्वासही पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.