ठाणे - काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिकेला 10 एमएलडी वाढीव पाणी देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महापौर म्हस्के यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी ठाण्याला पाणी वाढवून द्या नाहीतरी जेसीबी लावून स्टेम कार्यालय पाडून टाकण्याचा इशारा नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिला. ठाण्याला मिळणाऱ्या पाण्यावरून महापौर संतापल्याचे दिसून आले आहे.
सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून 113 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. वास्ताविक पाहता स्टेम प्राधिकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे योगदान मोठे आहे. ठाणे महानगरपालिकेला वाढीव पाणीपुरवठा करण्यामध्ये स्टेमकडून कुचराई करण्यात येते. याचा परिणाम ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. इतर महानगरपालिकांना वाढीव पाणी पुरवठा करण्यात येतो तर, ठाणे महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा का मिळत नाही नाही, असा प्रश्न देखील महापौरांनी उपस्थित केला आहे.
सर्वात जास्त पैसे भरुनही त्रास -
स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ठाणे महानगरपालिका सर्वात जास्त आणि वेळेवर पैसे भरते. असे असूनही ठाणे महानगरपालिकेला कमी पाणी मिळत आहे. या कारणावरून महापौर म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
श्रेयवाद सुरू -
ठाणे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ठाणेकरांना १० एमएलडी वाढीव पाणी मिळावे या मुद्यावरुन महापौरांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. हे पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार असल्याचा दावा भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे. परंतु ते पाणी एकट्या घोडबंदरसाठी नसून संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये पाण्याच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.