ठाणे - कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडल्यानंतरही कारागृहात आता कोरोना विषाणू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. तब्बल एका महिन्यानंतर आणखी एका कारागृह कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केलेल्या चाचणीत कारागृह कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कारागृहातील आरोपी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत कारागृह प्रशासनाकडून हेळसांड केली जात असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात, कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
राज्यातील विविध कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 23 मे रोजी पहिला रुग्ण ठाणे मध्यवर्ती कारागृहात आढळला होता. त्यानंतर, महिनाभराने पुन्हा कारागृहात कोरोना रुग्ण आढळल्याने आणखीही काही आरोपी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.