ठाणे (भाईंदर) : या घटनेमध्ये दोन जण जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. बचावकार्य सुरू असताना अडीच वाजताच्या सुमारास ढिगाऱ्याखाली एक मृतदेह आढळून आला आहे. पालिका प्रशासनाकडून संपूर्ण इमारत तसेच गाळे रिकामे करण्यात येत असून संपूर्ण इमारत जमीनदोस्त करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही इमारत धोकादायक असल्याने पालिका प्रशासनाकडून अनेकवेळा नोटीस देण्यात आल्या; परिणामी तळमजला सोडून सर्व इमारत रिकामी करण्यात आली होती. तळमजल्याला असलेले तीन ऑर्केस्ट्रा बार, चार परमिट बार हे रिकामे केले गेले नव्हते. १२ जुलैच्या आत संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने इमारतीला दिले होते. मात्र, तळ मजल्यावर असलेले हॉटेल मालक-चालक इमारत रिकामी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून संबंधित हॉटेल चालकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागले.
तर मोठी जीवितहानी झाली असती: धोकादायक इमारतीचा प्रश्न मिरा-भाईंदर शहरात मोठा असून अनेक धोकादायक इमारतींमध्ये नागरिक आपला जीव मुठीत घालून राहत आहेत. गुरुवारी नवकीर्ती इमारतीचा सज्जा कोसळला. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने ऑर्केस्ट्रा बार बंद होते. हीच घटना सायंकाळच्या वेळेस जर घडली असती तर खूप मोठी जिवीतहानी झाली असती. त्यामुळे आता पालिका ही इमारत संपूर्णपणे जमीनदोस्त करणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर: भाईंदर पूर्वेला अनेक इमारती नगरपरिषद काळातील आहेत. आज ज्या इमारतीचा सज्जा कोसळला ती इमारत देखील ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. संपूर्ण इमारत वाणिज्य वापरासाठी असून इमारतीमध्ये एकूण १०१ गाळे आहेत. अनेक गाळेधारकांनी खर्च करून दुरुस्ती केली आहे. प्रशासनाकडून वारंवार नोटीस दिल्यानंतर देखील गाळेधारक इमारत रिकामी करण्यास तयार नव्हते. या घडलेल्या घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून अति धोकादायक इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त करणे गरजेचे आहे; अन्यथा अशाच प्रकारच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे. या अगोदर दोन वर्षांपूर्वी भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीमधील एका इमारतीचा सज्जा कोसळला होता. यामध्ये देखील अनेकजण जखमी झाले होते. त्यावेळेस संपूर्ण इमारत रिकामी करून संपूर्ण इमारत तोडण्यात आली होती.
इमारतीतील सदस्याची तक्रार : नवकीर्ती इमारतीमधील एक सदस्य सतीश जयस्वाल यांनी सांगितले की, ही इमारत धोकादायक व जीर्ण झाल्यामुळे वारंवार पालिका प्रशासनाकडे मी वैयक्तिक तक्रार अनेक वेळा केली आहे; मात्र पालिका प्रशासन व तळमजल्यावर असलेल्या हॉटेल चालक यांच्या संगनमताने इमारत रिकामी करण्यात येत नव्हती. पूर्ण इमारत कोसळली असती तर कोणाला जबाबदार धरण्यात आले असते, असा प्रश्न जयस्वाल यांनी उपस्थित केला आहे.