ठाणे - कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला जनसेवेस झोकून देऊन ठाण्यातील श्रीरंग, वृंदावन, ऋतु पार्क, आनंद पार्क परिसर आणि ठाणेकरांसाठी लढणारे योद्धा, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रहास तावडे यांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी त्याना खासगी रुग्णालयातून सोडण्यात आले असून कोरोनाच्या विरोधात त्यांनी प्रखर संघर्ष केला आहे.
तावडे यांच्यावर कोरोना उपचार सुरू असताना 10 रेमडिसीवर इंजेक्शन देण्यात आले असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी चंद्रहास तावडे यांची पुन्हा कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. त्यानंतर शनिवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वृंदावन सोसायटीच्या परिसरातील असलेल्या हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. तसेच तब्बल 21 दिवसांनी घरी परतल्याने स्थानिक नागरिकांनी नियमाचे पालन करत तावडे यांच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षांव करून त्याचे स्वागत केले.