नवी मुंबई- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊननंतर राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या राज्याबाहेरील तसेच जिल्ह्याबाहेरील मजुरांना, नागरिकांना घरी जाण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. राज्याबाहेरील नागरिकांना राज्याच्या सीमेपर्यंत एसटी बसने सोडण्यात येत आहे. तर काही 'श्रमिक विषेश रेल्वे'चीही व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबईतील कळंबोलीतून मध्यप्रदेशच्या 235 मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले. पोलिसांच्या माध्यमातून मजुरांना पनवेल रेल्वे स्थानकातून मध्य प्रदेशच्या रेल्वेने गावाकडे पाठवण्यात आले.
हेही वाचा- लॉकडाऊन : पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक,' मुख्यमंत्री निधीत 10 हजारांची मदत
पनवेल परिसरामधून मध्यप्रदेश येथे जाणारे मजूर आणि कामगार यांना एकत्रित करण्यासंबंधी आदेश कळंबोली पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार पोलिसांनी मजुरांना एकत्रित केले. 235 मजुरांसमवेत त्यांचे कुटुंबीय एकत्र आले. त्यामध्ये काही लहान मुलांचा समावेश होता. या सर्व मजुरांना कळंबोली येथील सुधागड हायस्कुलमध्ये नेऊन वैद्यकीय तपासणी केली.
त्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकात आणून मजुरांना मूळगावी जाण्यासाठी सोडण्यात आले. आपल्या मूळगावी परतणाऱ्या मजुरांच्या चेहऱ्यावरील आंनद अवर्णनीय होता. दरम्यान, पोलिसांच्या माध्यमातून मजुरांच्या जेवणाची आणि चहापाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. कामधंदा नसल्याने मजुरांची अवस्था बिकट झाली होती. मात्र, पोलिसांच्या माध्यमातून जेवणखाण चहापाणी तसेच मूळगावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था केल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले. या मजुरांना एकत्र आणण्यासाठी पोलिसांनी एसटी बसेसची व्यवस्था केली होती. पनवेल परिसरातील वाढते शहरीकरण पाहता येथे मोठ्या प्रमाणावर मजुरांची संख्या होती. ते आता मूळगावी रवाना झाले आहेत.