ठाणे - भिवंडी तालुक्यातील ठाणे शहराच्या सीमे लगत असलेल्या कशेळी-काल्हेर या परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनधिकृत ठरवीत गेल्या पंधरा दिवसापासून कारवाई सुरू केली होती. मात्र कारवाई वेळी स्थानिक आमदार शांताराम मोरेसह ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे हे काल दुपारच्या सुमारास नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी आले होते. त्यातच अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना संतप्त झालेल्या शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या २५ ते ३० जणांच्या टोळक्यांनी अचानक एमएमआरडीएचे विधी अधिकारी मिलींद प्रधान व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करीत गोंधळ घातला होता. आज (शुक्रवारी) याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मारहाण व सरकारी कामात अडथळ्यासह गुन्हे दाखल करण्यात आले. यात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख थळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असून एमएमआरडीए क्षेत्र अंतर्गत भिवंडी तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये काल्हेर व कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झालेले आहे. यापैकी बहुतांश इमारती या अनधिकृत असून त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे एक जून पासून याठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या चोवीस तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास येथील स्थानिकांनी आदीपासूनच विरोध दर्शवला आहे. याठिकाणी दोनशेहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
कॅमेऱ्यामनलाही मारहाण करून चित्रीकरण केले नष्ट
एमएमआरडीएच्या कारवाई वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. तरीही शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी विधी अधिकारी प्रधान व त्यांच्या ५ ते ६ सहकारी अधिकाऱ्यांनाही मारहाण करीत शिवीगाळ केली. मारहाण करणारे एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी एमएमआरडीएच्या दोन कॅमेऱ्यामनलाही मारहाण करून त्यांच्या हातातील कॅमेरा हिसकावून घेतला. शिवाय त्यामध्ये असलेले मारहाणीचे व कारवाईचे चित्रीकरण नष्ट केल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात एमएमआरडीएचे विधी अधिकारी मिलींद प्रधान यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तुंबडा करीत आहेत.
राजकीय व्यक्तींना हाताशी धरून कारवाई
कशेळी, काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत फ्लॅट मिळत आहे. म्हणून नागरिकांनी ठाणे बाळकुम येथील दोस्ती ग्रुप बिल्डरच्या 50 लाख रुपयांच्या फ्लॅटला ग्राहक मिळत नसल्याने ते ठाणे येथील राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर व कशेळी या भागातच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी केला होता.
हेच शिवसेना पक्षाचे धोरण आहे का?
विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एमएमआर रिजनच्या समितीचे मुख्यप्रमुख असून त्यावर ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेही समितीवर आहेत. असे असताना त्यांच्या पक्षातल्या एका उपजिल्हा प्रमुखाने एमएमआरडीएच्या कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना मारहाण करणे हेच शिवसेना पक्षाचे धोरण आहे का, असा सवाल या घटनेनंतर भिवंडीकरांमध्ये चर्चिला जात आहे.
हेही वाचा -ठाण्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच केला खून; पत्नीसह प्रियकरालाही अटक