ठाणे : ढाब्यावर वाढदिवसाच्या पार्टी ( Birthday parties ) करून झाल्यावर पार्टीचे बिल एका मित्राने दिल्याने झालेल्या वादातून बड्डे बॉयने मित्रालाच चाकूने भोसकल्याची ( Knife Attack On Friend ) खळबळजनक घटना ( Sensational incident of stabbing a friend ) समोर आली आहे. ही घटना कल्याण - पडघा मार्गावर घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात बड्डे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला. अभय जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या बड्डे बॉयचे नाव आहे. तर, भाऊराव तायडे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मित्राचे नाव आहे.
माझा वाढदिवस आहे, पार्टी करण्यास कुठे तरी जाऊ - कल्याण - पडघा मार्गावरील बापगाव परिसरात भाऊराव तायडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. तर, कल्याणमध्ये राहणारा आरोपी अभय हा त्यांचा मित्र असून तो कल्याण मधील एका नामांकित महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. त्यातच २४ नोव्हेंबर रोजी आरोपी अभयचा वाढदिवस असल्याने तो संध्याकाळच्या सुमारास मित्र भाऊराव त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर आरोपी अभयने आज माझा वाढदिवस आहे. पार्टी करण्यास कुठे तरी जाऊ असे सांगितल्याने त्या दिवशी भाऊराव तायडे, आरोपी अभय, त्यांचे मित्र सुरेशसह काही मित्र एका ठिकणी पार्टीसाठी गेले होते.
पार्टीचे बिल तुझ्या मित्राने का भरले?.. त्या दिवशी वाढदिवशीची पार्टी आटपून सर्व मित्र बाहेर रस्त्यावर आले. त्यावेळी आरोपी अभयने भाऊराव यांना माझ्या वाढदिवसाच्या पार्टीचे बिल तुझ्या मित्राने का भरले? यावरून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून बड्डे बॉय अभयने भाऊराव यांच्या सोबत असलेल्या सुरेशवर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेशने तेथून पळ काढला. त्यानंतर अभयने चावीच्या गूछातील चाकू काढत मित्र भाऊराव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तायडे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.
बड्डे बॉय फरार.. दरम्यान, आरोपी अभय हा घटनास्थळावरुन पसार झाला. तर, जखमी भाऊराव यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. खडकपाडा पोलीस या प्रकरणी तपास करत असून फरार झालेल्या बड्डे बॉय अभयचा पोलीस शोध घेत आहेत.