ठाणे : डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकासमोर विष्णुनगर पोलीस ठाणे येथे काही वाहने जप्त करुन ठेवण्यात आली होती. मागील सात वर्षापासून विष्णुनगर पोलीस ठाणे आनंदनगर भागात स्थलांतरित झाल्यामुळे पोलिसांनी जप्त केलेली वाहने, कोपर पुलाच्या कोपऱ्यावर रेल्वेच्या जागेत आणून ठेवली आहेत. यामध्ये रिक्षा, दुचाक, टेम्पो यांचा सहभाग आहे.
अशी घडली घटना : गुरुवारी सकाळी दहा वाजता कोपर पुलाजवळ अचानक आगीच्या ज्वाला आणि धूर दिसला. यावेळी डोंबिवली वाहतूक विभागाचे कोपर, दिनदयाळ चौकात गस्त घालत असलेले हवालदार कीर्दत, आव्हाड, कोळी, वाहतूक सेवक दिनकर सोमासे, राजाराम शिरुडे, सुनील जगताप घटनास्थळी धावून आले. आगीच्या ज्वाला वाढल्याने कोपर पूल भागात दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूच्या चालकांना संयम राखण्यास सांगितले. तसेच आग विझल्यानंतर वाहने पुढे नेण्याची सूचना केल्या. सोमासे यांनी तातडीने अग्नशिमन विभागाला संपर्क केला. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी भडकलेली आग तातडीने विझवली. रेल्वे सुरक्षा दलाचे मनोहर, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले होते. आग विझविल्यानंतर कोपर पूल भागातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पेटती सिगारेट टाकली : अशाप्रकारची आग लागण्याचे प्रकार या भागात नियमित होतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. या वाहनांच्या ठिकाणी अज्ञात इसमाने पेटती सिगारेट टाकली असावी किंवा रात्रीच्या वेळेत याठिकाणी शेकोटी पेटविली असावी. पहाटेच्या वेळेत गर्दुल्ले तेथून निघून गेल्यावर विझविलेली आग वाऱ्याच्या प्रभावामुळे हळूहळू ही आग लागली असण्याची शक्यता, उपस्थितांकडून वर्तवली जात आहे.
हेही वाचा -