ठाणे - लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नरेंद्र मोरे आणि शिवकृष्ण अय्यर या २ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे नरेंद्र मोरे आरपीआय आठवले गटाचे ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत. महायुतीने आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप करत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे
रामदास आठवले यांना शिवसेनेच्या कोट्यातली मुंबईतली लोकसभेची जागा हवी होती. मात्र, ती न दिल्याने आठवले नाराज असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. यानंतर स्वतः आठवलेंनी शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले. मात्र, दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी अजूनही कायम असल्याचे चित्र आहे. कल्याणमध्ये झालेल्या मेळाव्यात आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. त्यातच कल्याण लोकसभा मतदारसंघातून आरपीआयच्या नरेंद्र मोरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
रामदास आठवले यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही महायुतीचे उमेदवार निवडून दिले होते. मात्र, त्यानंतर शिवसेना भाजपने आमच्याकडे दुर्लक्ष केले. कोणतीही पदे दिली नाहीत. शासकीय कमिटीवर घेतले नाही. आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोपी नरेंद्र मोरी यांनी यावेळी केला. यंदाच्या निवडणुकीतही समर्थन दिले. मात्र, कोणत्याही बैठकीत विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला असून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.