ठाणे : सरावापासून ते वर्दी मिळेपर्यंत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे. पोलीस भरतीसाठी येणारे बहुतांश तरुण हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आणि गरीब घरातील असतात. भरतीसाठी आल्यांनतर कुठे राहायचे हा मोठा प्रश्न असतो. अनेकवेळा भरतीसाठी शहरात आलेले तरुण हे फुटपाथवर झोपलेले दिसत आहेत. भावी पोलीसांची अशीच परिस्थिती ठाण्यात झाली आहे.
भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी जेवणाची सोय : ही बाब लक्ष्यात येताच ठाण्यातील राबोडी परिसरातील मुस्लिम बांधवानी भरतीसाठी आलेल्या सर्व तरुणाच्या जेवणाची सोय केली आहे. ही सुविधा मिळाल्याने तुटपुंज्या पैशाच्या जीवावर भरतीत उतरलेल्या या युवकांच्या मनामध्ये एक आधार निर्माण झाला आहे. पोलीस होण्याच्या आधी हिंदू मुस्लिम समाजाचे हे ऐक्य कर्तव्यावर देखील जपता येणार आहे. मुस्लिम समाजाने स्वतःहून पुढाकार घेऊन घेतलेले हे काम नक्कीच दोन समाजामधल्या जुन्या वाईट अनुभवांना विसरण्यासाठी मदत करणार आहे, शिवाय सामाजिक एकोपा टिकवण्यासाठी देखील मदत करणार आहे.
दोन दंगलींचा इतिहास : पोलीस परेड ग्राउंडच्या शेजारी असलेल्या राबोडी परिसरामध्ये दोन दंगलींचा इतिहास जुना आहे. पहिल्या दंगलीमध्ये काही हिंदूंची घर जाळण्यात आली होती. तर दुसऱ्या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या घरांचे नुकसान झालेले होते. या दोन्ही घटनांनंतर पोलीस प्रशासनाला दोन्ही समाजामध्ये तेढ करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले होते. आता या दोन्ही समाजामधल्या एकोप्यामुळे अशा अनोख्या प्रकारचे मदत कार्य पावसाळ्यात, गणेशोत्सवात आणि आता तर चक्क भरती प्रक्रियेत देखील पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सामाजिक एकोपा चांगला टिकून राहणार आहे.
विलंब विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक : पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान होणाऱ्या विविध चाचण्या आणि त्यासाठी येणारा हजारोंचा जमाव यांचे नियोजन करण्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे घ्यावे लागतात. या विविध टप्प्यांमुळेच भरती प्रक्रियेसाठी विलंब लागतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या याच विद्यार्थ्यांसाठी हा लागणारा विलंब हा त्रासदायक ठरतो. त्यामुळे खिशात पैसे नसताना त्यांची मोठी अडचण होते. नातेवाईक नसल्यामुळे अनेकांना तर अनेक आठवडे फुटपात वरच राहावे लागते. यामुळे जर या भरती प्रक्रियेमध्ये जलद गती आली, तर होणारा त्रास वाचू शकतो, असे विद्यार्थी सांगत आहेत.