ठाणे - अंबरनाथ मनसेच्या शहर उपाध्यक्षाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने भर रस्त्यात हत्या केली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी चार संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. राकेश पाटील असे हत्या झालेल्या मनसे शहर उपाध्यक्षाचे नाव आहे. उल्हासनगर मनसे विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे.
...असा झाला हल्ला
अंबरनाथ शहरातील पालेगाव परिसरात अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी काही कामानिमित्त गेलेल्या राकेश पाटील यांच्यावर चार जणांनी तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. पाटील यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना तात्काळ कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
गेल्या पाच वर्षानंतर पहिली राजकीय हत्या
हल्ल्यानंतर तात्काळ अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला. मृत राकेश पाटील यांनी अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तसेच अंबरनाथ शहरातील पालेगाव भागात नागरी समस्या घेऊन त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. दरम्यान, 2015 साली अंबरनाथमधील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येनंतर अंबरनाथ शहरात गेल्या पाच वर्षात एकही राजकीय हत्या झाली नव्हती. तर जागेच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.