ठाणे - घोडबंदर रोडवर गायमुख येथे एक भलामोठा दुधाचा टॅंकर ( Thane Tanker Accident ) ताबा सुटल्याने घसरला. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी क्रेनची मदत घेतली. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले वजन कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंटेनरमध्ये असलेले दूध फेकून ( Police Thrown Milk In Thane ) देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हा कंटेनर बाजूला काढून रस्ता मोकळा केला.
असा झाला अपघात -
आज दुपारच्या सुमारास २५ हजार लीटर क्षमता असलेला दुधाने भरलेला टाटा कंपनी दुधाचा टँकर गुजरातवरुन पुणे येथे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटून घोडबंदर रोडवरती टँकर पलटी झाला होता. त्यामुळे रोडवरती मोठ्या प्रमाणत ऑईल व दुध पडले होते. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन ऑईलवरती माती पसरवली आणि पलटी झालेला दुधाचा टँकर दूध फेकून घोडबंदर रोडच्या बाजूला करण्यात आला.
घोडबंदर रोड झाला अपघातांचा रस्ता -
ठाण्यातील घोडबंदर रोड हा गुजरात हायवे आणि नाशिक हायवेला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अवघड वळणे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे आता हा रस्ता अपघातांचा रस्ता झाला आहे. यावर लागलीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
हेही वाचा - Goa Assembly Election :..म्हणून अमित शहांविरोधात तृणमूल काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार