ठाणे - एका कसाईच्या घरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या दोन दुभत्या गाई व दोन वासरे अशी चार गोवंश जनावरांची सुटका पोलिसांनी केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील आसबीबी रोडवरील रुगठा डाईंग कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कसाईंच्या घरात घडली आहे, तर सुटका करण्यात आलेल्या गाई व वासरांना सुरक्षिततेसाठी अनगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चारही कसाई फरार झाले आहेत.
बाबू हाजी शाहमोहमद कुरेशी, नायाब अली शाहमोहमद कुरेशी व त्यांचे अन्य दोन साथीदार असे फरार झालेल्या आरोपींचे नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या चारही आरोपींवर पशुधन चोरी व गोवंश कत्तलप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्या चौघांनी संगनमत करून दुभत्या गाई व वासरे चोरून आणून त्यांची टेम्पोतून क्रूरतेने वाहतूक करून ती गोवंश हत्या करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आल्याचे दिसून आले.
दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा एक टेम्पो, १ लाख रुपये किंमतीची बुलेट मोटारसायकलसह एकूण ३ लाख २४ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पशुधन चोरीच्या घटनेचा पुढील तपास भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी करीत आहेत.