ठाणे - कल्याण डोंबिवली शहरात गुन्हेगारांनी एकच धुमाकूळ घातला असून दिवसाढवळ्या नागरिकांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना आज( शुक्रवारी) कल्याण पश्चिमेला घडली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने मारहाण करीत साडेबारा लाखांची रोकड लुटली.
कल्याण-मुरबाड रोड परिसरात बिर्ला कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावर रोशन पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाची रोकड बँकेत भरण्यासाठी आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरील कर्मचारी चालला होता. त्यावेळी मुरबाड रोडवरील फूटपाथवरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी मागून येऊन त्याला अचानक मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे कर्मचारी गांगरून गेला होता. ही संधी साधत त्याच्या हातातील साडेबार लाख रोकड असलेली बॅग घेऊन त्या अज्ञात त्रिकुटाने पोबारा केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मात्र, शहरात दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या गुन्ह्याने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.