ठाणे - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC च्या विरोधात देशासह राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी शांततेत मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. आज ठाण्यात अनेक संघटनांनी एकत्र येत या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढला. यामध्ये युवी पिढीचा लक्षणीय सहभाग असल्याचे पाहायला मिळाले.
या मोर्चाला हजूरी येथून सुरुवात झाली व त्याची सांगता तीन हात नाका येथे झाली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते या मोर्चात सामील झाले होते. मोर्चात शाहीर संभाजी भगत यांनीही सहभाग घेतला होता. आजची युवापिढी संपूर्णपणे भरकटलेली असल्याचे आपल्याला वाटले होते. परंतू, आजच्या मोर्चात सामील झालेल्या तरुणाईला बघून अभिमान वाटल्याचे मत संभाजी भगत यांनी व्यक्त केले. आपली नाळ या मातीशी समाजाशी आणि देशाशी जोडली असल्याने देशाला तोडणाऱ्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. हा देश बाबासाहेबांच्या घटनेनुसार चालत असून सत्ताधारी समाजामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करावा यासाठी आपण या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे भगत यांनी सांगितले.