ठाणे - कल्याणच्या बहुप्रतीक्षित पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या पुलाच्या कामाचा वेग पाहाता नव्या वर्षात कल्याण - डोंबिवली मार्गावर होणाऱ्या वहतूक कोंडीमधून नागरिकांची सुटका होण्याचा अंदाज आहे.
मार्च २०२१ ला नवीन पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचा आंदाज
येत्या मार्च महिन्यात नवीन पत्री पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता सरकारी यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गावर पुलाचा सांगडा ठेवण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला होता. नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका व्हावी यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे मार्च २०२१ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होतो, की "पुन्हा ये रे माझ्या मागल्या' होतंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पूलाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात
१९१४ साली बांधण्यात आलेला हा पत्री पूल ब्रिटिशकालीन होता. विशेष म्हणजे कल्याण-शिळफाटा रस्त्यातील रेल्वे मार्गावर असलेला हा पत्री पूल १०४ वर्षे जुना व धोकादायक झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १८ नोव्हेंबर २०१८ ला मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडून, त्याच ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेतले. या पूल उभारणीच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली मात्र, अ्दयापही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात तरी या पुलाचे काम पूर्ण होऊन, नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.