मीरा भाईंदर - मिरा भाईंदर शहरात 'बर्ड फ्लू' आजाराचा शिरकाव झाल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १२ ते २१ जानेवारी पर्यंत एकूण २५ कावळे आणि ९ कबुतरांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाला असून त्याची विल्हेवाट करण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्यासह कोणत्याही ठिकाणी मृत पक्षी आढळण्यास प्रशासनाला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना नंतर बर्डफ्लू -
देशभरातील विविध राज्यांसह महाराष्ट्रात देखील बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे समोर आले आहे. यात मिरा भाईंदरचा देखील समावेश झाला आहे. शहरात बर्ड फ्ल्यूचे प्रमाण कमी असले तरी गेल्या १२ ते २१ जानेवारी दरम्यान शहरातील विविध भागांत एकुण ३४ पक्षी बर्ड फ्ल्यूमुळे दगावले असुन या आजाराची लागण झालेल्यांमध्ये कावळ्यांचे प्रमाण २५ असे सर्वाधिक आहे. मात्र, शहरभर वाढलेल्या कबूतरांमध्ये देखील बर्ड फ्ल्यूचे विषाणू आढळून आले असुन त्याच्या संसर्गामुळे कबूतरांचा मृत्यू झाला आहे.कोरोना नंतर आता बर्ड फ्ल्यू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विल्हेवाटीसाठी तीन केंद्र सुरू -
बर्ड फ्ल्यूमुळे मृत होणाऱ्या पक्षांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने तीन केंद्रे सुरू केली आहेत. ही केंद्रे स्वच्छता निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत. नागरिकांना फ्ल्यूमुळे मृत होणारे पक्षी आढळून आल्यास त्वरीत संबंधित स्वच्छता निरीक्षकांना माहिती देण्याचे आवाहन यांनी डॉ. निराटले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले आहे.