मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. गुरुवारी 16 जानेवारी रोजी मध्यरात्री सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात चाकूनं हल्ला करण्यात आला होता. यानंतर त्याला मोठा मुलगा इब्राहिम अली खाननं तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. गुरुवारची रात्र सैफ अली खानसाठी खूप कठीण होती. या हल्ल्यात सैफवर 6 वेळा चाकूनं वार केला गेला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. सध्या सैफवर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया केली गेली. आता त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. हा अपघात झाला, त्यावेळी करीना आणि मुलेही घरी उपस्थित होती.
सैफ अली खानवर हल्ल्यानंतर बहीण सबानं दिली प्रतिक्रिया : या घटनेवर कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रियाही सातत्यानं समोर येत आहेत. अनेकजण सैफला भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात जात आहेत. आता सैफ अली खानची धाकटी बहीण सबा पतौडीनं याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'या धक्कादायक घटनेनं मला धक्का बसला आहे मी स्तब्ध झाले, पण मला तुझा अभिमान आहे भाईजान. कुटुंबाची काळजी घेणे आणि त्यांच्या नेहमीच पाठीशी उभे राहणे यामुळे अब्बाला देखील तुझा अभिमान वाटला असता. लवकर बरा हो, मला तिथे असायला पाहिजे होतं, लवकरच तुला भेटेन. मी नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि शुभेच्छा देत राहीन.'
सबा पतौडीनं शेअर केला बालपणीचा फोटो : इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्या फोटोमध्ये सैफ अली खान त्याची बहीण सबाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे. हा फोटो त्याचा बालपणीचा आहे. दरम्यान सैफ अली खानची बहीण सबानं लग्न केलं नाही. ती तिच्या आई आणि भावाबरोबर त्याच बिल्डिंगमध्ये राहते. ही घटना घडली त्यावेळी ती घरी नव्हती. सध्या, ती कुठेतरी बाहेर आहे. सबाचे मुंबई आणि दिल्लीमध्येही अनेक घरे आहेत. ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. सबा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि ती तिचा बहुतेक वेळ त्यांच्याबरोबर घालवत असते. तिचे सैफच्या मुलांशीही प्रेमळ नातं आहे. याशिवाय ती करीना कपूर खानच्याही खूप जवळची आहे.
हेही वाचा :