अमरावती- भरधाव वेगातील वाहनांमुळे महामार्गावरून अधिवासात जाणाऱ्या बिबट्यांचे जीव धोक्यात आले आहेत. अमरावती- नागपूर महामार्गावर वाहनाच्या धडकेत आज पहाटे बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा मृत्यू ( leopard deaths in Amravati) आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचं पथक अमरावती- नागपूर महामार्गावर पोहोचलं. वाहनाची जोरदार धडक लागल्यानं गंभीर जखमी होऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचं वनविभागाच्या पथकाला निरीक्षणा दरम्यान दिसून आलं. मृत बिबट्याला वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात नेण्यात आलं. याच परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. त्यानंतर वनविभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महिन्याभरात चार बिबट्या ठार- अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडीच्या जंगलात 7 डिसेंबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला होता. या घटनेच्या लगेच दुसऱ्या दिवशी याच भागात आणखी एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दगावला. सलग दोन दिवस दोन बिबट्या एकाच मार्गावर ठार झाल्यामुळं खळबळ उडाली होती. यानंतर 20 डिसेंबरला अमरावती-नागपूर एक्सप्रेस हायवेवर वडाळी ते महादेव खोरी दरम्यान गुणवंत बाबा मंदिरालगत दोन वर्षे वयाचा बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार झाल्याचं समोर आलं होतं. महिनाभरात अमरावती शहर आणि शहरालगत चार बिबट्या ठार झाल्यानं वन्यप्राणीप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अमरावती शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला. बिबट्यांच्या सुरक्षेबाबत आणि रहिवासी भागात नियमित दिसणाऱ्या बिबट्यांसंदर्भात वनविभागाकडून योग्य नियोजन व्हावं, अशी मागणी आता जोर धरत आहे.
या परिसरात अनेकदा असतो बिबट्यांचा वावर
- बिबट्या ठार झालेल्या अमरावती- नागपूर महामार्गावरील परिसरात रहिवाशांना अनेकदा बिबट्याचं दर्शन घडतंय. यापूर्वी राहटगाव ,अर्जुन नगर , विभागीय आयुक्तालय परिसर या भागातील रहिवाशांना अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला. या भागात आणखी बिबट्या आहेत, असं या परिसरातील नागरिक सांगतात.
- दोन्ही बाजूनं डोंगर आणि जंगल असल्यानं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात अनेकदा बिबट्याचं दर्शन घडतं. डिसेंबर २०२४ मध्ये वन विभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याच्या पिल्ल्याला पिंजऱ्यात कैद केलं.
हेही वाचा-