ठाणे - निवडणूक आयोगांनी २०१४ मध्ये तृतीयपंथीयांना मतदानाचा अधिकार दिला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत ४४९ तृतीयपंथीयांची मतदार यादीत नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, ४४९ तृतीयपंथीय मतदारांपैकी केवळ १०३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
विशेष म्हणजे तृतीयपंथांमध्ये मतदानाचा टक्का वाढवा, यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने सदिच्छा दूत म्हणून तृतीयपंथीय गौरी सांवत यांची नेमणूक करण्यात आली होती. गौरी सावंत यांनी स्वत: तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाचा हक्क बजावा यासाठी प्रयत्नही केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याचे ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथीयांनी केलेल्या मतदानाच्या आकडेवारी दिसून आले आहे.
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ४४९ तृतीयपंथीय मतदारांची नोंद मतदार यादीत करण्यात आली. यापैकी सर्वाधिक ७२ जणांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात आपला हक्क बजावला आहे. त्यांची सरासरी ११.२२ टक्के इतकीच आहे. जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण या ३ लोकसभा मतदारसंघांमध्ये ६२ लाख २५ हजार १९४ मतदार आहेत. त्यामध्ये ४४९ तृतीयपंथीय मतदारांची नोंद आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात इतरमध्ये ६४ तृतीयपंथीय मतदार आहेत. केवळ १५ तृतीयपंथीय मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. यात मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात १, ओवळा-माजिवडा मतदारसंघात २, कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात ४, ऐरोली येथे ८ अशा १५ जणांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. तर बेलापूर आणि ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात एकाही तृतीयपंथीय मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही.
तर कल्याण लोकसभा मतदारसंघात २७३ तृतीयपंथीय मतदार आहेत. यातील ७२ तृतीयपंथीय मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. यात अंबरनाथमध्ये १, उल्हासनगर ८, कल्याण (पूर्व) ५०, कल्याण ग्रामीण १३ असे मतदान झाले आहे. तर डोंबिवली-मुंब्रा-कळवा येथे एकाही तृतीयपंथीयाने मतदान केले नाही.
भिवंडी मतदारसंघात ११५ तृतीयपंथीय मतदार आहेत. यातील केवळ १६ तृतीयपंथीय मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. यात भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात १२, भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात ४ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. तर भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड या विधानसभा क्षेत्रात एकाही तृतीयपंथीयांनी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सर्वाधिक २६.३७ टक्के तृतीयपंथी मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर ठाणे येथे २३.४४ टक्के आणि भिवंडी येथे १३.९१ टक्के या गटातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.