ठाणे - उल्हासनगर पोलीस परिमंडळ ४ मध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाला ४ ते ५ दुचाकी चोरीला जात असल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आले. उल्हासनगरात दोन दुचाकी चोर दुचाकी चोरून अंबरनाथच्या दिशेने येत असता चोरलेल्या दुचाकीचा मालक दुसऱ्या दुचाकीवरून या चोरट्यांचा पाठलाग करत होता. त्याच सुमारास चोरलेली दुचाकी रस्त्यावर अचानक घसरल्याचे पाहून दोन्ही चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान दोघांपैकी एकाने थेट नदीत उडी घेऊन दुचाकी मालकाला चकमा देण्याचा प्रयत्न केला.
...या भीतीने नदीत मारली उडी
दोघेही चोरटे अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या वेशीवरील साईबाबा मंदिराजवळ येताच त्यांनी पळवलेली दुचाकी अचानक स्लिप झाली. यामुळे आपण आता पकडले जाऊ म्हणून एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दुसऱ्याने मात्र पकडले जाऊ या भीतीने थेट वालधुनी नदीत उडी घेतली. चोरट्याने नदीत उडी घेतल्याचे पाहून त्याच्या पाठोपाठ दुचाकीचा मालक आणि स्थानिक तरुणांनी नदी उडी घेत या चोरट्याला नदीच्या पात्रातून बाहेर काढत स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले.
दुसऱ्या चोरट्याचा शोध सुरु -
उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या साथीदाराचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. एकीकडे लॉकडाऊन काळात चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र अनलॉकपासून दुचाकी चोरीचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसत आहेत.