नवी मुंबई - पुण्यातील निगडी येथे प्रांताधिकारी असल्याचे सांगून, महिलांना लग्नाचे आमिष दाखवून, फसवणूक व इतर अफरातफर करणाऱ्या २८ वर्षीय तोतयाला खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. तुषार मारुती ठिगळे असे या २८ वर्षीय तोतयाचे नाव आहे. आरोपीने प्रांत अधिकारी असल्याचे खोट ओळखपत्र देखील बनवले होते, हे ओळखपत्र दाखवून तो नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असे, तसेच त्याने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
विवाहित असून देखील करत होता महिलांची फसवणूक
दरम्यान हा आरोपी विवाहित असून, त्याने पत्निच्या नातेवाईकांची देखील फसवणूक केल्याचे समोर आले आहे. रेल्वेत नोकरी लावून देतो व सरकारी लॉटमधील सेकंडहँड कार स्वस्तात देतो म्हणून, त्याने पत्नीच्या नातेवाईकांकडून 1 लाख 95 हजारांची रक्कम घेतल्याचे देखील समोर आले आहे. तसेच त्याने प्रांताधिकारी असल्याचे भासवून अनेक लग्नाळू तरुणींना जाळ्यात ओढले आहे.
गाडीला अंबर दिवा व सोबत बाऊन्सर घेऊन फिरत होता
आरोपी तुषार ठिगळे हा आपण सरकारी अधिकारी आहे, असं भासवण्यासाठी गाडीला अंबर दिवा लावून व सोबत बाऊन्सर घेऊन फिरत होता. त्याने मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, परिसरातील मुलींना लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने तब्बल 1 कोटी 65 लाख 86 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्याला नेरुळमधून खांदेश्वर पोलिसांनी अटक केली.
आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद
या तोतयावर खांदेश्वर, पनवेल, रायगड जिल्ह्यातील खालापूर, ठाणे पोलीस आयुक्तालयातील मानपाडा, पुणे पोलीस आयुक्तालयातील चंदननगर, नाशिक येथील आडगाव, मुलुंड अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
हेही वाचा - लोटे एमआयडीसीतील समर्थ केमिकल्समध्ये भीषण स्फोट, तिघांचा मृत्यू