मुंबई - गोरेगाव येथील आरे परिसरात आज सोमवारी (दि. 24 ऑक्टोब)रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवाळी पहाटच्या निमित्ताने आईसोबत सकाळी मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या इतिका अखिलेश लोटे या दीड वर्षांच्या मुलीवर वाटेतच बिबट्याने हल्ला केला, त्यामध्ये तीचा मृत्यू झाला आहे.
दिवाळीनिमित्त मंदीरात जाताना हल्ला - सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. आरेतील युनिट क्रमांक १५ येथे इतिका आणि तिची आई रहाते. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळीच नजीकच्या मंदिरात जाण्यासाठी दोघी निघाल्या होत्या. इतिका आईसोबत चालतच जात होती. तेवढ्यात बिबट्याने इतिकावर हल्ला केला त्यामध्ये तीचा मृत्यू झाला आहे.
पाहणी आम्ही करणार - ईतिकाच्या आईने आणि आजूबाजूनच्यांनी ओरडायला सुरुवात केल्यानंतर बिबट्याने इतिकाला वाटेतच सोडत जंगलात धाव घेतली. या घटनेनंतर इतिकाला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच वनाधिकारीही सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल झाले. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी आम्ही करणार आहोत, अशी माहितीही वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बिबट्याच्या अधिवासक्षेत्रात आवश्यक काळजी घ्या - बिबट्याचा अधिवास असलेल्या क्षेत्रात सायंकाळ आणि पहाटेपर्यंत लहान मुलांना घराबाहेर काढू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बिबट्याला माणूस भक्ष्य म्हणून आवडत नाही. डोळ्याला समांतर दिसणारे कुत्रे किंवा बक-या बिबट्या आपले भक्ष्य बनवतो. त्यातच कित्येकदा लहान मुलांवर बिबट्याचा हल्ला होतो. बिबट्याच्या अधिवासक्षेत्रात आवश्यक काळजी घ्या, असे आवाहन वनविभागाने केले आहे.