ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विरोधात उल्हासनगरमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी (Offensive sloganeering against CM Shinde) करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील ठाकरे गटाने आयोजित केलेल्या मशाल रॅलीत (Thackeray group Mashal Rally Thane) हा प्रकार घडला असून मोर्चात ५० खोके, एकदम ओके, गद्दार, निंब का पत्ता कडवा है ... आदी घोषणा देण्यात आल्या. काही घोषणांवर विरोधकांनी आक्षेप नोंदविल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी आज ठाकरे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह ९ पदाधिकाऱ्यांवर १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
शिंदे - ठाकरे गटात मोठे वादविवाद होण्याची शक्यता - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्या नंतर ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी या मशाल रॅलीचे आयोजन २३ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. जिजामाता उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मशाल रॅली काढण्यात आली होती. या मशाल रॅलीत घोषणा देतांना कार्यकर्त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला आणि त्यांनी या घोषणा दिल्या. या प्रकारामुळे शिंदे - ठाकरे गटात मोठे वादविवाद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
शाखा प्रमुख सागर कांबळे अटक.. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, महिला आघाडीच्या मंगला पाटील, मनिषा राजपुत, सागर सोनकांबळे यांच्यासह ९ जणांवर कारवाई केली. त्यांना नोटिसा पाठवून चौकशी साठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर शाखा प्रमुख सागर कांबळे याला मशाल मोर्चातील घोषणेबाजी प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली.
कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही... आम्हीही चौकशीला सामोरे जाणार असून कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया गुन्हा दाखल झालेले शाखाप्रमुख चौधरी यांनी दिली. तर शिवसेना ठाकरे गटाने, पोलीस कारवाई बाबत आश्चर्य व्यक्त करून सत्ताधाऱ्यांचे एकदिवस बिंग फुटणार असल्याची चर्चा ठाकरे गटाच्या शिवसैनिकामध्ये रंगली आहे.