नवी मुंबई - देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी नवी मुंबईत 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 440 झाली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अपयश येत आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
नवी मुंबईत आत्तापर्यंत 451 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 5059 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 465 जण निगेटीव्ह आले असून, 1148 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 440 इतकी आहे. बुधवारी 248 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले होते, त्यापैकी 203 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून, 45 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचे मृत्यू झाले आहेत. तर बुधवारी 3 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. शहरातील बरे झालेल्यांची एकूण संख्या 51 आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवी मुंबईत 96 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
बुधवारी एपीएमसीमध्ये 23 नवे रुग्ण आढळले असून, कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणी दरम्यान त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एपीएमसीमधील फळ बाजार व भाजीपाला बाजारात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार काम करत असून, कोरोनाबाधित असूनही ते मार्केटमध्ये काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कित्येक वेळा मार्केट बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.
काही व्यापारी वर्गाच्या दबावामुळे मार्केट बंद करण्यासाठी बाजार समितीने मार्केट बंद करण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. सद्यस्थितीत एमपीएससी मधील कर्मचारी व त्यांचे निकटवर्तीयांमध्ये 100 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य अधिकारी एपीएमसी बाजारात दाखल झाले आहेत.