ठाणे - कल्याण लोकसभा मतदारसंघात १९ लाख ६५ हजार ६३७ मतदार असून २ हजार ६३ मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी ६ मतदान केंद्रे ही महिला अधिकाऱ्यांमार्फत (सर्व महिला) चालवली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबने यांनी दिली.
कल्याण लोकसभा जागेसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यावेळी सकाळी ७ वाजता सुरू होणारे मतदान सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४ लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यानंतर डोंबिवली ३ लाख ४१ हजार, कल्याण पूर्व ३ लाख ४० हजार, मुंब्रा-कळवा ३ लाख ३७ हजार, अंबरनाथ ३ लाख ८ हजार आणि उल्हासनगर २ लाख २६ हजार मतदार आहेत. तर एकूण मतदारांचा विचार करता १० लाख ६१ हजार ३५६ पुरुष मतदार आणि ९ लाख ३ हजार ५०२ महिला मतदार आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान १ मतदान केंद्र हे महिला अधिकाऱ्यामार्फत संचलित करायचे आहे. त्यानुसार अंबरनाथमध्ये फादर अग्नेल शाळा चिंचपाडा, उल्हासनगर मनपा १७७, प्रशासक शहर वसाहत २३७, कल्याण पूर्वेत नूतन ज्ञानमंदिर तिसगाव, डोंबिवलीत एस.व्ही.जोशी हायस्कूल, कल्याण ग्रामीणमध्ये लोढा वर्ल्ड स्कूल पलावा आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील मनिषा विद्यालय कळवा, या ६ केंद्रांवर महिलाराज असणार आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व कामकाज महिलावर्ग सांभाळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कादबने यांनी दिली.
त्या जोडीला अपंग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प लावणे, मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, मतदारांसाठी हेल्प डेस्क, दिशादर्शक आणि अन्य माहिती फलक, उन्हापासून संरक्षणासाठी शेड, दिव्यांग मतदारांसाठी स्वयंसेवक, लहान मुलांसाठी तात्पुरते पाळणाघर, दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था या सुविधाही मतदानाच्या दिवशी असणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात २ हजार ५९४ व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात येणार आहेत.
१८ ते ४० वयोगटातील तब्बल ७ लाख ३७ हजार मतदार
कल्याण लोकसभा मतदारसंघात १८ ते ४० वयोगटातील तब्बल ७ लाख ३७ हजार मतदार असून त्यातही पहिल्यांदा मतदान करणारे १२ हजार ३३६ युवा नवमतदार असणार आहेत. तर ७० ते ९० वयोगटातील १ लाख ३२ हजार मतदार आणि ४० ते ६९ वयोगटातील तब्बल १० लाख ५७ हजारांहून अधिक मतदार असल्याचेही निवडणूक अधिकारी शिवाजी कादबने यांनी सांगितले.
वयोगट आणि मतदार
१८ ते १९ वर्षे : १२ हजार ३३६
२० ते २९ वर्षे : 2 लाख ६६१६७
३० ते ३९ वर्षे : ४ लाख ५८ हजार ६६५
४० ते ४९ वर्षे : ४ लाख ९४ हजार ५८२
५० ते ५९ वर्षे : ३ लाख ५८ हजार ७४१
६० ते ६९ वर्षे : २ लाख ४ हजार ३२६
७० ते ७९ वर्षे : ८९ हजार ०३
८० ते ८९ वर्षे : ४३ हजार ७८८