नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज दिवसभरात नव्याने 169 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर, आज 54 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आज चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत असून प्रशासनाच्या चिंतेत भर आणखी भर पडत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयदेखील कमी पडत आहेत. त्यामुळे वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1 हजार 100 बेडचं तात्पुरत कोव्हीड रुग्णालय उभारण्यात आलं आहे. हे रुग्णालय रुग्णांवरील उपचारासाठी खुले करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 914 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 जण हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. तर, आत्तापर्यंत नवी मुंबईत 14 हजार 991 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 717 जण निगेटिव्ह आले असून, 371 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 903 इतकी आहे. आज 169 जण (14जून ) कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भेमधील 25, बेलापूर मधील 9, कोपरखैरणे मधील 23, नेरुळमधील 22, वाशीतील 17, घणसोली मधील 24, ऐरोली मधील 46, दिघ्यातील 3 असे एकूण 169 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 52 स्त्रिया व 117 पुरुषांचा समावेश आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3 हजार 903 इतका झाला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 2 हजार 186 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर, आज बेलापूर मधील 3, नेरूळ मधील 10, वाशी मधील 2, तुर्भे मधील 10, कोपरखैरणे मधील 18, घणसोली मधील 6, ऐरोली मधील 4, दिघा 1 असे एकूण 54 व्यक्ती आज कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये 21 स्त्रिया आणि 33 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीत 1 हजार 545 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 4 रुग्णांचा बळी गेला आहे.