ठाणे - यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही शिवसेनेचीच सरशी झाली. अखेर सभापती उपसभापती निवडणुकीत विस्कटलेली युतीची घडी पुन्हा सावरून युती करत बाजार समितीवर युतीचा झेंडा फडकवला. त्यामध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे कपिल थळे तर उपसभापतीपदी भाजपचे प्रकाश भोईर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मात्र निवडणूक संपताच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना नाराज शिवसैनिकांनी घेराव घालत संताप व्यक्त केला. कल्याण व भिवंडी लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात काम करणार असल्याचे सांगितल्याने दोन्ही मतदारसंघात बाजार समितीच्या निवडणुकीवरून पुन्हा भाजप-सेना कार्यकत्यांची फाटाफूट झाल्याचे दिसून आले आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल ८ वर्षांनी १७ मार्चला घेण्यात आली. या निवडणुकीत सेनेला ८ तर भाजपला ६, राष्ट्रवादी ३ आणि मनसे १ असे पक्षीय बलाबल होते. यामुळे सभापती पदावर शिवसेनेचा दावा होता. मात्र तरीही कोणताही दगाफटका होऊ नये, यसाठी शिवसेनेकडून आपल्या सर्व सदस्यांना तब्बल २८ दिवस आज्ञातवासाच्या नावाखाली अलिबाग, महाबळेश्वर येथे धाडण्यात आले होते. अखेर मंगळवारी दुपारी या सदस्यांना थेट बाजार समितीच्या आवारात उतरवुन सभागृहात पोहोचविण्यात आले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी पक्षाचा आदेश असल्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत युती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत थळे यांचे नाव सभापती पदासाठी जाहीर केले. तर सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या मयूर पाटील यांची समजूत काढली. दुसरीकडे उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून मंगलदास म्हस्के यांनी आणि भाजपकडून प्रकाश भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र उपस्थित वरिष्ठांनी युतीचा निर्णय झाल्याने भाजपला उपसभापतीपद देण्यात येणार असल्याचे सांगत म्हस्के याना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याने त्यांचे समर्थकांनी शिवसेनेच्या नेत्यावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान उपसभापतीपदी भाजपचे प्रकाश भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पाटील यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित सभापती थळे यांचा कार्यकाल ५ वर्षासाठी असेल असे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी सांगितले. मात्र शिवसेनाचा एक गट संतप्त होवून त्यांनी निवडणूक संपताच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना घेराव घालत धारेवर धरले होते. तर काही शिवसैनिकांनी बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळी लढून अखेर भाजपशी घरोबा केल्यामुळे कल्याण व भिवंडी लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात काम करणार असल्याचे सांगितल्याने दोन्ही मतदारसंघात बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा भाजप-सेना कार्यकत्यांची फाटाफूट झाल्याचे दिसून आले आहे.