ठाणे MNS Aggressive Again Marathi Boards : न्यायालयाच्या आदेशानंतर मराठी पाट्यांचा पुन्हा एकदा वाद चिघळताना दिसत आहे. सर्व आस्थापनांवरील फलक देवनागरी (मराठी) भाषेत असावेत, असा आदेश न्यायालयानं दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पाट्यावरील इंग्रजी नावं काढून मराठी भाषेत नाव टाकावीत, अशी मागणी मनसेनं केली आहे. याबाबत दुकावावर मराठी फलक लावण्यासाठी मनसेनं दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दोन दिवसांत सर्व आस्थापनांवरील फलक मराठीत न लावल्यास मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे नेते स्वप्नील महेंद्रकर यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत कामगार विभागाचे प्रदीप पवार यांनी 12 दुकान निरीक्षकांची नियुक्ती करत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
फलक तपासण्याच्या आयुक्तांच्या सूचना : ठाणे महापालिका क्षेत्रातील दुकान, अस्थापनाच्या पाट्या ठळक अक्षरात मराठीत लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत. कामगार विभागानं प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार महापालिका, नगर पंचायत, नगर परिषदांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका आतापासून दुकानं, विविध आस्थापनांचे मराठी फलक तपासणार आहे. दुकानं, आस्थापनांचे फलक मराठीत आहेत की नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर दिल्या आहेत.
मनसेचा दोन दिवसांचा अल्टिमेटम : महाराष्ट्रातील दुकानं, हॉटेल्ससह इतर सर्व आस्थापनांच्या पाट्या मराठीतूनच लिहाव्यात अशी मागणी मनसेची आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर देखील अनेक दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत, असल्याचंही मनसेचं म्हणणं आहे. त्यामुळं सर्व दुकानावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं करत दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अल्टीमेटम संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणी ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 809 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 160 आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातून 7 लाख 7 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मनसे आक्रमक : ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्व दुकानदारांना मराठीत फलक लावण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. प्रशासनानं दुकानदारांवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलंय.
राजकारण नको, अंमलबजावणी व्हावी : या प्रकरणी मनसेनं भाजपावर मतांचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे. मात्र मनसेचे आरोप भाजपानं फेटाळून लावले आहेत. याबाबत भाजपा नेते संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही न्यायालयाचा आदर करतो. महाराष्ट्रात मराठी पाट्या लावल्या जाव्यात अशी सगळ्यांचीच इच्छा असल्याचं संजय वाघुले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -