ठाणे - मुरबाड तालुक्यातील धसई जवळ असलेल्या धरणाच्या भिंतीलगत विहीर आहे. या विहिरीचा अर्धा भाग दोन वर्षापासून खचलेल्या अवस्थेत असल्याने धरणातून दिवसागणिक लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सततच्या गळतीमुळे महिनाभरात धरण तळ गाठणार असून यामुळे भविष्यात परिसरामध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, लघुपाटबंधारे याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहे.
लघुपाटबंधारे विभागाकडून१९८३ साली उभारण्यात आलेल्या धसई धरणाची अवस्था दोन वर्षापासून जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.या धरणाच्या माध्यमातून आसपासचे ४५७ हेक्टर क्षेत्र सिंचणाखाली आले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून धरणातील पाण्याचा फार मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लघुपाटबंधारे विभागाच्या उदासीनतामुळे पंचक्रोशीतील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. धरणातील बारमाही जलसाठय़ामुळे परिसरातील विहिरींनाही पाणी असते. मात्र दोन वर्षांपासून त्या विहिरी उन्हाळ्यात तळ गाठत असल्याने दोन ते अडीच महिने काढायचे कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. आता तरी शासनाने तातडीने विहिरीची दुरुस्ती करून धरणातील पाणी गळती थांबवावी, अशी मागणी शेतकरी सतीश शिंदे यांनी केली आहे. तर लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर सावंत यांच्याशी संपर्क साधला असता दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्याबरोबरच ते मंजूर करण्यात आले असून येत्या १५ मार्चपासून दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.