ठाणे - दिल्लीतील एका बंटी बबलीच्या जोडीने अंबरनाथ शहरात राहणाऱ्या एका महिलेला किडनी डोनेटच्या नावाखाली तीन लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पीडित महिलेला किडनी डोनेट केल्यास ४ कोटी रुपये मिळतील, अशी थाप मारून दिल्लीच्या बंटी बबलीने गंडा घातला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबिना वादी (वय २५ वर्षे) आणि अरविंद कुमार (वय २८ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या बंटी बबलीचे नावे आहेत.
फेसबुकवर मैत्री, आयुष्य सुखद होण्याचे स्वप्न दाखवून रचला बनाव
अंबरनाथ पूर्व मधील म्हाडा कॉलनी परिसरात कल्पना मगर (वय ३०) ह्या कुटुंबासह राहतात. त्यांची दिल्लीत राहणाऱ्या आरोपी रबिना वादी या तरुणीसोबत मार्च २०२० मध्ये फेसबुकवर मैत्री झाली होती. त्यानंतर त्या दोघी फेसबुकवर एकमेकांशी गप्पा मारू लागल्या. दरम्यान, कल्पना मगर यांनी त्यांच्या कौटुंबिक समस्येबाबत रबिनाला फेसबुकवर सांगितले. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे कल्पना यांनी मैत्रीण म्हणून आरोपी तरुणीला सांगितले. त्यावेळेस रबिनाने देखील तिची परिस्थिती पूर्वी कमकुवत होती. पण आता आपण खूप सुखात असल्याचे सांगितले.
मैत्रिणीच्या सुखासाठीचा स्वार्थी सल्ला...
फेसबुकवर गप्पा मारत मारत रबिनाने मुद्द्याला हात घालायला सुरूवात केली. रबिनाने तिची एक किडनी 4 कोटी रुपयांमध्ये डोनेट केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर कल्पना यांनादेखील किडनी डोनेट करण्याचा सल्ला दिला. किडनी डोनेट केल्यावर तुला देखील 4 कोटी रुपये मिळतील आणि तुझे आयुष्य सुखद होईल, असा स्वार्थी सल्ला रबिनाने कल्पना यांना दिला.
पैशांचा मोह पडला महागात
कल्पना मगर देखील या कोटी रुपयांच्या आमिषाला बळी पडल्या. त्यासाठी काय करावे लागेल याची चौकशी केली. आरोपी रबिनाने कल्पना यांना डिपॉझिट स्वरूपात दहा लाख रुपये भरावे लागतील आणि किडनी डोनेट झाल्यानंतर तुम्हाला चार कोटी रुपये मिळतील, असे आश्वासन दिले. त्यांनतर पैशांच्या मोहाला बळी पडून कल्पना यांनी तीन लाख रुपये आरोपी रबिनाच्या सांगण्यावरून अरविंद कुमार याच्या नवी दिल्लीतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जमा केले. मात्र, किडनी डोनेटची प्रक्रिया पुढे सरकत नसल्याने कल्पना यांनी रबिनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रबिनाने कल्पना यांच्याशी संपर्क तोडला. अखेर कल्पना यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मग त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक करणाऱ्या रबिना आणि अरविंदच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनही गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षिक जमदाळे करत आहेत.
हेही वाचा - अभ्यासाचा तगादा लावला म्हणून अल्पवयीन मुलीने केला आईचा खून