ठाणे - वाहनांच्या अधिक सुरक्षेसाठी आणि नोंदणीसाठी सोमवारपासून (१ एप्रिल) नवीन उत्पादित वाहनांना HSRP (High Security Registration Plates) प्लेटस बसविण्यात येणार आहेत. या प्लेट्स उत्पादक आणि वितरकांमार्फत बसविल्या जाणार आहेत.
केंद्र शासनाने दिनांक ४/१२/२०१८ आणि ६/१२/२०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १ एप्रिल पासून नविन उत्पादित होणाऱ्या वाहनांना वाहन उत्पादक/वाहनाचे वितरकामार्फत HSRP प्लेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे १ एप्रिल नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९च्या नियम ५०नुसार नोंदणीसाठी आल्यास HSRP प्लेट बसविल्याबाबत खातरजमा करुनच नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात येईल, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय सासणे यांनी कळविले आहे.
HSRP ची सुरक्षा वैशिष्ट्ये
HSRP प्लेट ही टेंम्पर प्रुफ स्वरुपातील असून स्नॅप लॉकव्दारे एकदा वाहनावर लावल्यानंतर त्याचा उपयोग कोणत्याही अन्य वाहनांवर करता येणार नाही.
HSRP प्लेट ही कोणत्याही नैसर्गिक कारणाने पुसट किंवा खराब झाल्यास वाहन नोंदणी तारखेपासून पुढील १५ वर्षापर्यंत वितरकाकडून विनामुल्य बदलून दिली जाईल.
HSRP प्लेटवर पेटंटेड क्रोमिअम बेस होलोग्राम हा अशोक चक्र आकारात हॉट स्टॅम्प पध्दतीने प्लेटवर चिटकवला जाणार आहे.
प्लेटवर वाहन क्रमांकावर रेट्रो रिफलेक्टींग प्लेट ही हॉट स्टॅम्प आणि इंबोसमेट पध्दतीने ज्याच्यावर व्हेरिफीकेशनसाठी IND हा शब्द ४५ डिग्रीच्या कोनावर प्रत्येक अक्षर आणि अंकावर छपाई केली जाणार आहे.
तसेच प्रत्येक HSRP प्लेटवर किमान ९ अंकी परमनंट आयडेटिफीकेशन क्रमांक हा लेझर इंबॉसमेंट पध्दतीने छापला जाणार आहे. ज्याच्यावर वाहन निर्मात्याचे, टेस्टींग एजन्सीचे आणि वाहन वितरकाची माहिती ही कोड स्वरुपात छापली जाणार आहे.
चारचाकी वाहनास पुढच्या व मागच्या HSRP प्लेटसहित एक तिसरे रजिस्ट्रेशन मार्क स्टिकर असणार आहे. त्याच्यावर वाहनाच्या पुढील आणि मागील प्लेटचे कोड तसेच वाहनाचा क्रमांक सेल्फ डिस्ट्रक्टीव स्टिकर स्वरुपात प्राप्त होणार आहे, जो वाहनाच्या पुढील विंड स्क्रिन काचेवर डाव्या बाजूला खाली चिटकवायचे आहेत.
वाहन उत्पादक हे HSRP उत्पादकामार्फत नंबर प्लेटचा पुरवठा त्यांच्या स्थानिक प्रतिनिधीमार्फत वितरकाकडे करतील. वाहन वितरक हे मोटार वाहन विभागाकडून प्राप्त झालेले वाहन नोंदणी क्रमांक हा HSRP उत्पादकाच्या प्रतिनिधीला कळवतील. HSRP चा प्रतिनिधी नोंदणी क्रमांकाची यादी तयार करुन वितरकाकडे सादर करतील. वाहन वितरक हे HSRP प्लेट वाहनास बसवतील. HSRP चा सिरीअल क्रमांक हा वितरक वाहन प्रणालीला नोंद करतील, त्यानंतर वाहनांचे आरसी प्रमाणपत्र जारी करतील. HSRP प्लेटच्या प्रणालीमुळे वाहन चोरीच्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट होईल.
यासंदर्भात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यक्षेत्रात नोंदणी असणाऱ्या सर्व वाहन वितरकांना या सर्व उपाययोजनांबाबत एक बैठक घेऊन सविस्तररित्या माहिती देण्यात आली. तरी नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी १ एप्रिल पासून HSRP प्लेटशिवाय वाहने ताब्यात घेवू नये आणि रस्त्यावर वापरू नयेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण संजय ससाणे यांनी केले आहे.