नवी मुंबई - बऱ्याच दिवसांनी नवी मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. नवी मुंबई, पनवेल, उरणसह पनवेलकरांना शुक्रवारी पावसाने झोडपले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पनवेलमधील गावदेवी पाडा परिसरामध्ये घरात पाणी शिरले होते. शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. दिवसभरात १४१ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. पनवेल, शहर, नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे परिसरामध्ये पाणी साचले होते. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रवेशद्वारांवर एक फूटपेक्षा जास्त पाणी साचले होते. मॅफ्कोपासून बाजार समितीपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचले असल्याची माहिती मिळाली.तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते.